ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो. अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील नवचैतन्य प्राप्त होते असे तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज.
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नांची, शिवरायांनी जीवनभर घेतलेल्या त्या ध्यासाची आज आपण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. केवळ लोकसभा किंवा विधानसभेमध्ये बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही, त्या साठी गरज आहे दूरदृष्टी असलेल्या तरुणांची. आज आपल्याला ब्र्हाम्हदेवसुद्धा वाचवू शकणार नाही. काळ फार कठीण आहे. आता गरज आहे आपल्याला पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि संस्कृतीची सुरक्षा करण्याची. शिवचारीत्रा सारखा धगधगता दीपस्तंभ समोर असताना हे कार्य कठीण नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा कधीच कुठल्याही गुलामगिरी मध्ये असूच शकत नाही. हे नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि आले तरी ते तुमच्या आमच्या हातामध्ये ढाल तलवार देणार नाहीत. आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पण सोडून आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान, संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान देशाची निर्मिती करायची आहे. तरच शिवबाच्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेला आपल्याला दिसेल.
आणि हे घडवायचे असेलतर प्रथम आपल्याला आपले शिवाजी महाराज पूर्ण कळणे आवश्यक आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतरचे महाराजांचे पराक्रम आपल्याला माहित आहेत किंबहुना अनेक चित्रपट, नाटकातून आपण ते पहिले आहेत. पण हे पराक्रमी शिवाजी महाराज घडले कसे ? त्यांच्यावर संस्कार कोणी केले ? त्यांना स्वराज्याचे बाळकडू कोणी पाजले ? माणसांची पारख आणि चौफेर दूरदृष्टी त्यांच्याकडे आली कशी ? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अवघ्या महाराष्ट्राला आज मिळण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आम्ही 'शिवबा' हे नाटक रंग भूमीवर आणले आहे. या नाटकाचे आत्तापर्यंत ८० प्रयोग महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध ठिकाणी झाले आहेत. 'जाणता राजा' मध्ये जे राहिलं ते 'शिवबाने' पूर्ण केलं. अशा शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या नाटकाचे कौतुक केले आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत अश्या अनेक मान्यवरांनी या नाटकाचे कौतुक केले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर गोवा सरकार मार्फत या नाटकाचे प्रयोग संपूर्ण गोव्या मध्ये करण्याचे ठरवले, त्या पैकी काही प्रयोग झालेसुद्धा.
जवळ जवळ १०० तरुण कलावंतांचा सहभाग असलेल्या या नाटकाला आज गरज आहे ती आपल्या सारख्या मान्यवरांच्या रसिकांच्या पाठींब्याची. तरच हा महाराजांचा माहीत नसलेला इतिहास आम्ही तमाम महाराष्ट्रातील जनतेसमोर आणू शकतो. आपल्या सहकार्याने महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवरायांच्या कार्याची, पराक्रमाची आणि शौर्याची नवी गुडी संपूर्ण महाराष्ट्रात उभारण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.
आपण आमच्या या वेबसाईटला भेट दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपणही आपल्या विभागात हा प्रयोग सादर करावा व आमच्या या समाजकार्यात मोलाचे सहकार्य करावे.
हि नम्र विनंती.
जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवबा.
आपले विश्वासू,
प्रा. मंदार टिल्लू प्रा. प्रदीप ढवळ
दिग्दर्शक लेखक |